आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं, जागीच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

| Updated on: Dec 28, 2023 | 8:32 AM

Pune Dumper Accident Marathi News : आधी स्कुटरला धडक दिली, मग चिमुरड्याला चिरडलं... आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू झालाय. आक्रमक झालेल्या स्थानिकांनी थेट डंपर पेटवला. काळीज पिळवटून टाकणारी घटना... चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ... वाचा सविस्तर बातमी...

आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं, जागीच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 28 डिसेंबर 2023 : आपण अनेक अपघाताच्या बातम्या वाचतो. मात्र आजच्या या अपघाताने तुमचंही हृदय हेलावेल. एक डंपर पुण्यातील कात्रज परिसरातील मंतरवाडी चौक भागातून जात होता. या डंपरने आधी एका स्कुटरला धडक दिली. नंतर एका चिमुकल्याला चिरडलं. अन् या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडलं अन् आईने टाहो फोडला… या घटनेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आईसमोर चिमुकल्याला डंपरने धडक देणं. त्याला चिरडणं अन् त्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू होणं… या घटनेची आपण कल्पना जरी केली. तरी आपल्या डोळ्यात पाणी येईल.

डंंपरची स्कुटरला धडक

पु्ण्यातील मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा स्कुटरला धडक दिली. या स्कुटरवर कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 हा आईसोबत जात होता. पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला. आईसमोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्यचा जागीच मृ्त्यू झाला. डोळ्यासमोर चिमुकल्यावरून डंपर गेला. त्यामुळे शौर्यच्या आईने टाहो फोडला. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे.

जमावाने डंपर पेटवला

चिमुकल्याला चिरडल्यानंतर डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले. ज्या ठिकाणी डंपर पेटवला होता. त्याच्यावर लाईटच्या तारा असल्याने लाईट बंद केली गेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. डंपर मात्र जळून खाक झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावत डंपरला लागलेली आग विझवली.

अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोळ्यासमोर आपला मुलगा गेल्याने आईच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये. आजूबाजूचे लोकही शोकाकूल झालेत. ज्यांनी हा अपघात पाहिला. त्यांच्या डोळ्यासमोरून हे दृष्य जात नाहीये.