मुंबई । 17 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशाने अनेकांना धक्का बसला आहे. मंत्रिपदाचे दावेदार समजले जाणारे शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार त्यामुळे पुन्हा वेटिंग लिस्टवर गेले आहेत. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे खातेवाटपात फेरबदल झाले. त्याचप्रमाणे आता पालकमंत्रीही बदलले जाणार आहेत. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद येण्याची शक्यता आहे. नाही म्हणता म्हणता देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ खाते अजित दादा यांच्याकडे आले. त्याचप्रमाणे पुण्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच जाणार याची धास्ती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.
एरव्ही सभा, दौरे, पत्रकार परिषद यामधून एकमेकांवर टीका करणारे मंत्री, आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त एकमेकांसमोर आले की हस्तांदोलन करतात. काही गप्पा गोष्टी करतात. मात्र, अशावेळी त्यांनी केलेल्या टीकेला समोरून उत्तर येत तर त्यावर पुन्हा प्रतिपक्षाकडून प्रत्युत्तर येतं. कधी कधी अशा टोले, प्रतिटोले यामुळे विधिमंडळातलं वातावरण काहीस हलकंफुलकं होतं.
अशाच किस्सा विधानभवनाच्या परिसरात घडला. पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर उभे राहिले होते. त्यावेळी ‘हू इज धंगेकर’ असा सवाल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
तेच आमदार रवींद्र धंगेकर विधानभवनाच्या इमारतीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यासोबत बोलत उभे होते. त्याचवेळी त्यांच्यापाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अधिकाऱ्यांसह चर्चा करत होते. अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील विधानभवनातून जाण्यास निघाले.
याचवेळी माजी आमदार मोहन जोशी यांनी त्यांच्याकडे पाहून, दादा आपण पालकमंत्री आहात. पाल्याकडे लक्ष ठेवा, असं म्हणत दादांचे लक्ष वेधले. त्याला मनमुराद दाद देत चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या वेळ अशी आहे की पाल्याने आपल्या पालकमंत्र्यांचे पालकमंत्री टिकविण्यासाठी काही तरी केलं पाहिजे.’
चंद्रकांत दादा यांच्या या कोटीवर तिथे एकच हास्यकल्लोळ झाला. मात्र, हा रोख अजित दादांच्या दिशेने होता हे जाणवलेच. शिवाय आपलं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडेच जाणार याची खात्री चंद्रकात पाटील यांना असल्याचंही दिसून आलं.