योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 02 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जतमध्ये बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, ही निवडणूक कशी होईल, याची राज्यभर चर्चा होऊ लागली. या बाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांचा पक्ष वेगळा झालेला आहे. त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघ ते लढवतील. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचंय, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी टोला लगावला. दादा मुख्यमंत्री होणार की नाही हे मला माहित नाही. पण एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ, असं जयंत पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. परिस्थिती अशी की ते कधीही पदावरून जातील म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाहीत. तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवन योग्य नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
कोण मुख्यमंत्री होणार याची तशी बरीच यादी मोठी आहे. उरलेल्या जागांची ही घोषणा अजित पवार करतील. भाजपने बरीच माघार घेतलेली दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीत राष्ट्रवादी किती जागा लढवणार, असं विचारलं असता लोकसभेचे आमचं अगणित अजून ठरलं नाही.थोड्या दिवसानंतर चर्चा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.