Pune : तीन अल्पवयीन मित्र पोहायला गेले, पण दोघे मात्र… दुर्दैवी घटनेनं पुणं हादरलं

| Updated on: Jan 23, 2024 | 9:05 AM

पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाघोली येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीत ही दुर्दैवी घटना घडली.

Pune :  तीन अल्पवयीन मित्र पोहायला गेले, पण दोघे मात्र... दुर्दैवी घटनेनं पुणं हादरलं
Follow us on

पुणे | 23 जानेवारी 2024 : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाघोली येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीत ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या १२ वर्षांची ही दोन अल्पवयीमन मुलं मृतावस्थेत सापडली असून त्यांच्या कुटुंबियांना एकच टाहो फोडला.  वाघोली पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.अली अहमद शेख (  वय 12 वर्षे ), कार्तिक दशरथ डूकरे ( वय- 12 वर्षे, दोघेही रा शिवरकर वस्ती, वाघोली ) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

नेमकं काय झालं ?

वाघोली येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीतील पाण्यात पोहोण्यासाठी तीन मुलं गेली होती. त्यापैकी दोघे जण पाण्यात खाली उतरले आणि पोहू लागले. मात्र त्यांचा तिसरा मित्र वरच थांबला होता, बऱ्याच वेळा बोलावूनही तो काही खाली उतरला नाही. अहमद शेख आणि कार्तिक डुकरे हे दोघे पाण्याचा आनंद घेत पोहत होत, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी ते आकांत करत हातपाय मारू लागले, पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

आपले मित्र बुडत आहेत हे पाहून त्यांचा तिसरा मित्र हबकला आणि तातडीने घराकडे धाव घेत त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. ही बातमी ऐकून धाबे दणालेल्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अग्निशामक दलाचा जवानांना कळवलं, त्यांनी तातडीने खाण परिसरात धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला. एका स्थानिक व्यक्तीने एक मुलाचा तर अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. हसत्या-खेळत्या मुलांचा क्षणात अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील काळजाचा तुकडा गेल्याने त्यांचे कुटुंबीय शोकाकुल झाले, घर दु:खात बुडाले. याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.