पुणे : पुण्यातील वडगाव शेरी या मतदार संघातील राजकारण सध्या जोरदार तापलं आहे. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी मतदार संघातील विविध विकास कामे होत नाही, प्रशासन सहकार्य करत नाही म्हणून उपोषण सुरू केले आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल देखील सुनील टिंगरे यांनी केला आहे. याच आरोपांवर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळे मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत सुनील टिंगरे हे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे. निष्क्रिय आमदार म्हणून सुनील टिंगरे यांची ओळख असल्याचा नवा आरोपही करत जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका केली.
खरंतर विधान सभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षे बाकी आहे. त्यापूर्वी पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यामुळे मुद्दा जरी विकासकामांचा असला तरी दुसरीकडे मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे आज पासून उपोषण सुरू झाले आहे. वडगाव शेरीचे आमदार असलेले सुनील टिंगरे यांनी महापालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले जात आहे.
यावेळेला आमदार सुनील टिंगरे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. यामध्ये सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे. नाराजी व्यक्त करत सुनील टिंगरे आक्रमक झाले आहे.
तर दुसरीकडे याच आरोपांवर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका करत प्रशासनावरील आरोप फेटाळून लावले आहे. पत्रकार परिषदेत जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांचे उपोषण नसून नौटंकी असल्याचा आरोप केला आहे.
यावेळेला जगदीश मुळीक म्हणाले सुनील टिंगरे यांचे उपोषण म्हणजे त्यांचं अपयश आहे. सुनील टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठं विकास काम करता आलं नाही. सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे असा टोला ही यावेळला लगावला आहे.
विकास कामाचे श्रेय लटण्याचं काम आमदारांनी केलं आहे. लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. उपोषणाची नौटंकी करण्याचं केलं जातंय. टिंगरे यांचे ज्या बांधकाम व्यावसायिकांशी आर्थिक संबध आहेत, त्या बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागाकडे तक्रार करणार आहोत असेही जगदीश मुळीक यांनी म्हंटलं आहे.
एकूणच पुण्यातील आजी माजी आमदार यांच्यात निवडणुकी पूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.