पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भीमा पाटस साखर कारखान्याच्या संदर्भात आक्रमक झालेले असतांना भाजपच्याच माजी जिल्हाध्यक्ष तथा तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. आमदार राहुल कुल यांच्याविरोधात हल्लाबोल करत संजय राऊत यांच्या बाजूने असल्याचे म्हंटलं आहे. खरंतर भाजपचे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याचे कागदपत्रे देखील संजय राऊत यांनी ईडीकडे दिले असून त्याची पोच मिळाल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आणि कारखान्याच्या सभासदांची बाजू मांडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर तक्रारदार नामदेव ताकवणे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे तक्रार दार नामदेव ताकवणे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यानंतर नामदेव ताकवणे यांनी राहुल कुल यांच्यावर हल्लाबोल करत आमच्या आमदाराला खुमखुमी आहे असं म्हंटलं आहे.
संजय राऊत यांची सभा होऊ नये यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. मात्र आम्ही संजय राऊतांना घेऊन कारखाना स्थळावर जाणार असल्याचे नामदेव ताकवणे यांनी सांगत राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजय राऊत यांच्या सोबत असल्याचा खुलासा केला आहे.
कारखान्याचे तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी राहुल कुल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सभासदांसाठी आज संजय राऊत सभा घेत आहेत. त्यामध्ये चेअरमनला हार घालायला जाणं हा काही गुन्हा आहे का? असा सवाल नामदेव ताकवणे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा तक्रारदार नामदेव ताकवणे संजय राऊत यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पोलिस कारखाना परिसरात जाण्यास बंदी घालणार असल्याची माहिती असल्याने ताकवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
खरंतर संजय राऊत यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तयारी केली जात असतांना भाजपचे नेतेही संजय राऊत यांच्या बरोबर असल्याने राहुल कुल यांच्या अडचणी वाढत असून विरोधक मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.
संजय राऊत काही पुरावे सादर करून ही पोलखोल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भीमा पाटस साखर कारखान्याच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.