पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ माजली. शनिवारवाड्यात बेवारस बॅग असल्याचा एक कॉल आला आणि पुळे पोलिसांनी तत्काळ तिथे धाव घेतली. पर्यटकांनी गजबजलेला शनिवार वाडा काही क्षणात रिकामा करण्यात आला. ट्रेन केलेल्या श्वानांना घेऊन बॉम्बशोधक पथकही शनिवार वाड्यात दाखल झाले असून शोधमोहिम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज ( शनिवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास कंट्रोल रूमला एक फोन आला. शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग आढळली असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. ही माहिती कळताच पुणे पोलिस तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने तेथे धाव घेतली. शनिवार वाड्याचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला, सर्वांना तेथून बाहेर पाठवण्यात आले. आणि त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने तपास सुरू केला. बेवारस बॅगेची कसून तपासणी सुरू असल्याचे समजते.
सध्या सुट्टीचे दिवस असल्याने आणि आज वीकेंड असल्याने मोठ्या प्रमाणत लोकं, पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी आले होते. मात्र बेवारस बॅगेची बातमी ऐकताच एकच घबराट पसरली आणि लोकांनी बाहेर धाव घेतली. सध्या शोधमोहिम सुरू असून शनिवार वाड्याबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तो फेक कॉल होता ?
आज सकाळी नियंत्रण कक्षाला एक कॉल आणि शनिवारवाड्यात बेवारस बॅग ठेवली असून त्यामध्ये बॉम्ब आहे, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपास करत आहोत. बॉम्बशोधक पथकही बोलावण्यात आलं आहे. पण आत्तापर्यंत अशी कोणतीही संशयित वस्तू किंवा बॅग इथे आढळून आली नाही. शनिवारवाड्यात आतला संपूर्ण परिसर चेक करण्यात येत आहे. फायर ब्रिगेडची टीमही घटनास्थळी आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तो फेक कॉल असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.