योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 28 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना मोठं विधान केलं आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. देशात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकतं. सध्या सुरु असलेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. छगन भुजबळ यांना जेलबाहेर काढणारा मीच आहे. मी जर न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ जेलबाहेर आले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जातंय. देशात सत्ता बदललेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळी भूमीका घेतात. आणि परराष्ट्रमंत्री वेगळा निर्णय युद्धाबाबत घेत आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील भिडे वाड्याला भेट दिली. महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपलं मत मांडलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संविधानाबाबतचं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचं आणि सरसंघचालक मोहन भागवतांचं आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं, असा पोलिसांना अलर्ट आला आहे. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर देशात काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषद म्हटलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे की, संविधान बदलणार नाही. पण जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही. तोवर आम्ही मान्य करणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.