पुणे : पुण्यातील नामांकित हॉस्पिटलपैकी एक असलेल्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचं समोर आलं आहे. टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखा प्रकार असून यामधून कोटींचा घोटाळा झाला आहे. गरिबांसाठी असलेला इंडिजंट पेशंट फंड संदर्भात अफरातफर झाली आहे. रूबी हॉल क्लिनिक हे धर्मादाय हॉस्पिटल असून त्याचा दर महिन्याला उत्पनाची माहिती धर्मादाय विभागाला द्यावी लागते. मात्र हॉस्पीटलचं जेवढं उत्पन्न आहे ते कमी दाखवलं गेलं आहे. अनेक नातेवाईकांनी आरोप केला असून तक्रारही केल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.
रूबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाबाबत धर्मादाय विभागाला अहवाल सादर केला जातो. मात्र 2019 पासून रूबी हॉलच्या अहवालांची पडताळणी केली असता त्यामध्ये खोटी माहिती दिल्याचं धर्मादाय सह आयुक्त सुधीर कुमार बुक्के यांच्या निदर्शनास आलं.
2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रूबी हॉल क्लिनिकला महिन्याला जेवढं उत्पन्न होतं त्याच्या दहा टक्के रक्कम गरिब रूग्णांवर खर्च करणं बंधनकारक आहे. मात्र गरिबांना निधी शिल्लक नसल्याचं सांगत रुग्णांना माघारी पाठवल्याचा आरोप केला गेला आहे. इतकंच नाहीतर गरिबांसाठी असणाऱ्या निधीसाठी काही एजेंट पैसे खात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना सेवा मिळणं बंधनकारक आहे. मात्र एजेंट टक्केवारी घेऊन फाईल आयपीएफमध्ये बसवत आहेत. यामध्ये मॅनेजमेंटचे काही लोकही सामील असल्याचाही आरोप केला जात आहे. यामध्ये रूग्णालयातील बिलिंगचे मनोजकुमार श्रीवास्तव या पदाधिकाऱ्यांचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.