पुण्यात पुन्हा हिट अँड रन, डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं

| Updated on: Dec 23, 2024 | 8:04 AM

पुण्यातील वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन, डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं
Pune Wagholi Accident
Follow us on

Pune Wagholi Accident : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला होता. त्यातच आता पुन्हा पुण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एका भरधाव येणार डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर आहे. हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्वजण कामगार असून ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. या अपघातावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते.

जखमी आणि मृत व्यक्तींची नावे समोर

या दुर्घटनेत विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नगेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18) आलिशा विनोद पवार (47) अशी या ६ जणांची नावे आहेत. या दुर्घटनेतील जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे. हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या घटनेनंतर आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (26) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे.