पुणे : महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील काही भागात पोस्टर्स लागली आहेत. अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचे समर्थक आपल्या नेत्यांचे बॅनर्स लावून त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता या भावी मुख्यमंत्रीदावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे किती दावेदार आहेत याची आकडेवारीच बावनकुळे यांनी सांगितली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तर मुख्यमंत्रीपदाचे तीन दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. तर राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. ठाकरे गटात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. एकाच पक्षात तीन तीन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. असे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे एकूण 10 दावेदार आहेत. 10 मुख्यमंत्र्यांचे हे तीन पक्ष आहेत, अशी खिल्ली चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली आहे.
2024 पर्यंत विरोधकांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणखी वाढतील. ही लिस्ट वाढतच जाणार आहे. आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं खंबीर नेतृत्व आहे. त्यामुळे 2024मध्ये पुन्हा कमळ फुलेल आणि भाजप-शिवसेनेचाच राज्यात मुख्यमंत्री होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत इना मिना डिका सुरू आहे. अजित पवारांसारख्या काम करणाऱ्या नेत्याची काय हालत केली? विरोधक असले तरी अजितदादांच्या कामाची एक पद्धत आहे. माझ्यासारख्याला भाजपने राज्याचं अध्यक्ष बनवल. पण अजितदादांची काय अवस्था झालीय? मला पक्ष संघटनेत काम करू द्या, असं त्यांना बोलावं लागतंय, असा चिमटाही त्यांनी काढला.
विरोधकांची नुकतीच बिहारच्या पाटणा येथे बैठक पार पडली. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी जी काही मते मांडली आहेत, त्याच्या उलट सगळं होणार आहे. 2019मध्ये एकूण 17 पक्ष एकत्र आले होते. तेव्हाही त्या सर्वांना पंतप्रधान व्हायचं होतं. आताही 19 जण एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे. पण लोक यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करणार आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.