अभिजीत पोते, पुणे : पुणे शहरात शनिवारी दिवसाचे तापमान (Temperature) 34.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे ज्यामुळे कालचा दिवस 1996 नंतरचा सप्टेंबरमधील दुसरा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (India Meteorological Department), शनिवारी नोंदवलेले दिवसाचे तापमानदेखील सामान्यापेक्षा 5.9 अंश जास्त होते. आयएमडीने आतापर्यंतच्या सर्वात जास्त दिवसाच्या तापमानाचा विक्रम सप्टेंबर 1951मध्ये नोंदवला होता. त्यावेळी दिवसाचे तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर 1996पासून आतपर्यंत सर्वात उष्ण तापमान सप्टेंबर 2020मध्ये 34.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. यानंतर या वर्षी उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की शनिवारी शहरातील अनेक भागांमध्ये क्लाउड सेल तयार झाल्याची नोंद झाली.
दुपारच्या सूर्यप्रकाशामुळे तापमानात वाढ होते आणि दिवसाचे तापमान 33 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. आर्द्रतादेखील दुपार आणि संध्याकाळच्या वेळी सामान्य ढगाळ वातावरण होते त्यामुळे वातावरणात आर्द्रता होती. त्यामुळे मेघगर्जना आणि विजांचाही प्रभाव काही प्रमाणात दिसून आला, असे कश्यपी म्हणाले.
कोथरूड, भावधन, लोहगाव, विश्रांतवाडी, विद्यापीठ रस्ता या भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 4 सप्टेंबर म्हणजे आजही विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत रात्रीपासून सतत हलक्या गडगडाटाचा आवाज येत आहे. काल संध्याकाळपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परिणामी गेल्या 24 तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
Latest radar obs at 8.30am indicate moderate intensity ~39-46dbz clouds with heights ranging 5-6 km ovr Mumbai.Continuous mild thunder being heard since night with mod to intense spells of rains since yesterday evening, resulting in heavy rains at few places in city in last 24hrs pic.twitter.com/nUcpMk14RF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2022
6 सप्टेंबरपर्यंत अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये 5 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू राहण्याची शक्यता आहे, असे कश्यपी यांनी सांगितले. 5 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर कोणत्याही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नाही.