पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (75 Independence Day) उत्साह दिसून येत आहे. पुण्यातील (PUNE) ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यासमोर (Shaniwarwada) मध्यरात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाडा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या ध्वजारोहणाला खासदार गिरीश बापट यांच्यासह सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे देखील उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती. भारत माता की जयच्या जयषोघाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुणेकर मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, कोट्यवधी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावला आहे. यासाठी भाजपाच्या वतीने ‘हर घर तिंरगा’अभियान चालवण्यात आले. या उपक्रमात नागरिक उत्सर्फूतपणे सहाभागी झाल्याचे दिसून येत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशात ठिकठिकाणी ध्वाजारोहण करण्यात येत आहे. तसेच 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींना सजवण्यात आले असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालकिल्ल्यावरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील जनतेला स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे मोठे योगदान असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तसेच आजचा दिवस हा ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली त्या थोर महापुरुषांचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी स्वदेशीचा नारा दिला आहे.