पिंपरी चिंचवड : जीममध्ये (Gym) व्यायाम करत असताना आणखी एक दुर्घटना घडली आहे. एका तरुणाचा व्यायाम (Exercise) करताना मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात हा प्रकार घडला आहे. अनमोल गोजे (वय 23) असे तरुणाचे नाव आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना तो बेशुद्ध झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. पुनावळे येथील एका फिटनेस क्लबमध्ये अनमोल व्यायाम करण्यासाठी जात होता. तिथेच हा प्रकार घडला आहे. दररोजच्या प्रमाणे तो मंगळवारीही तो जीममध्ये आला. साधारणपणे सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तो अचानक बेशुद्ध पडला. जीममध्ये असलेल्या इतर मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुनावळे येथील ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. भूक मंदावते. शरीराला पाण्याची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे जीममध्ये व्यायाम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. जास्त व्यायाम आणि जास्त वजन उचलणे जीवावर बेतू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अनमोलच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे. त्याला रुग्णालयात दाखल तर केले, मात्र तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
डॉक्टर म्हणाले, उन्हाळा सुरू झाला असल्याने डिहायड्रेशन होते. अशावेळी भरपूर पाणी प्यावे. कोणताही व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी. जीममध्ये जात असाल तर तेथील प्रशिक्षकाच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा. अतिवजन उचलणे टाळावे. कोणतेही सप्लिमेंट घेताना डॉक्टरांचा तसेच त्यातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. प्रत्येकाचे शरीर आणि क्षमता वेगेवेगळ्या असू शकतात. त्यामुळे इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्याला काय योग्य आहे, हा विचार करूनच व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.