रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावशीसोबत पिकनिकला आलेला 10 वर्षाचा मुलगा कुसगाव धरणात बुडाल्याची घटना घडली. धरणाच्या पाण्यात खेळताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव परंदवाडी पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला पाण्यातून बाहेर काढले. तात्काळ मुलाला सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हडपसर येथून मावशी पल्लवी साळवे सोबत सदर मुलगा मावळ तालुक्यातील कुसगाव धरणावर फिरण्यासाठी आला होता. मावशी आणि भाचा पाण्यात खेळत होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि मुलाचा शोध सुरु केला. मुलाचा शोध घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय गावित, पोलीस हवालदार जॉन पठारे, पोलीस नाईक खेडकर आणि निलेश संपतराव गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे, ग्रामस्त राजाराम केदारी आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.