पुणे : बावधन येथील कचरा डेपो प्रकल्प (Bawadhan garbage depot) करायला विरोध होत आहे. त्यामुळे एक समिती नेमून त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून दोन दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. आज पुणे महापालिका आयुक्तांची (PMC commissioner) त्यांनी भेट घेतली तसेच काही विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, की त्या ठिकाणच्या लोकांचे समाधान झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही. प्रस्ताव दिला आहे. काम दोन-तीन दिवस तरी थांबेल, असे ते म्हणाले. 23 गावांच्या पाण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. त्या भागात रोज पाणी (Water supply) द्या, एक दिवसाआड देऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावर एक बैठक ठेवली जाईल, त्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर तिसरा महत्त्वाचा विषय उड्डाणपुलाचा होता. उड्डाणपूल व्हावेत. अडचणी असतील तर त्या सोडवल्या पाहिजेत. नागरिक विरोध करत असतील तर पूल पाडणे हा उपाय नाही, असेही ते म्हणाले.
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. नवीन रंगमंदिर बांधल्यामुळे अधिक जागा मिळेल, त्यामुळे त्याचाही विचार करावा. बालगंधर्व नवनिर्माणाबाबत रंगकर्मी बसून एकत्र निर्णय घेतील, असे ते म्हणाले. ट्रान्झिट कालावधीत त्रासाचा सामना करावा लागू शकतो, मात्र नंतर सर्व समस्या दूर होत असतात. तरीही सर्वांशी चर्चा केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. राम नदीच्या शुद्धीकरणासाठी रिव्हर फ्रंटसाठी मोठ्या प्रमाणावर राम नदीच्या किनाऱ्यांचाही समावेश झालेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेनेच्या हुंकार सभेला काय उत्तर द्यायचे ते देऊ अशी टीका त्यांनी केली. 14 तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका करत 15 तारखेला देवेंद्र फडणवीसांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेच्या हिंदुत्वावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांची सभा होत आहे, म्हणून आमची नाही. आमची सभा आमची आहे. त्यावेळी त्यांना उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले. आता फक्त न्यायालयातच न्याय मिळू शकतो. राज्यात कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. तक्रार लिहेपर्यंत चार फोन त्याला येतात. त्यामुळे आता न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात, असे ते म्हणाले.