पुणे : स्वतःच हक्काचं घर असावं असं साऱ्यांनाच वाटतं. काहींना ते पारंपरिक मिळते. तर काही जणांना स्वतःच्या कष्टातून ते उभं करावं लागतं. शिरकोली येथील एका शेतकऱ्यानं स्वतःच्या नव्या घराचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी पै-पै जमा केला. पुण्याला घराच्या बांधकामाचं साहित्य खरेदी करण्यासाठी गेला. तिथं टेम्पोत साहित्य भरलं. सोबत चुलतभाऊ होता. घराच्या बांधकामाचं साहित्य घेऊन ते घराजवळ आले. तेवढ्यात दुर्घटना घडली नि होत्याचं नव्हतं झालं.
वेल्हा तालुक्यातील पानशेत भागातील शिरकोली येथे घराचे बांधकाम साहित्य घेऊन जाणारा पिक अप टेम्पो पलटला. या अपघातात एका शेतकऱ्याचा दुर्देवी अंत झाला आहे. आपल्या नव्या घराचे स्वप्न उराशी बाळगून कोंडीबा आबाजी ढेबे (वय ४५, रा.शिरकोली) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शिरकोली येथील घराजवळ जाण्यासाठी कच्चा दगडांचा रस्ता आहे. या रस्त्यावरून पिकअप जात असताना पलटी होवून हा अपघात झाला.
कोंडिबा ढेबे आणि त्यांचा भाऊ तुकाराम ढेबे हे घराचे बांधकाम करण्यासाठी पुण्यातून बांधकाम साहित्य घेऊन पिकअप टेम्पोमधून चालले होते. कच्च्या दगड गोट्यांच्या रस्त्यावरून चढावर टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पोमध्ये बसलेले ढेबे हे टेम्पो खाली चिरडून जागीच मृत्यूमुखी पडले.
अशी माहिती शिरकोलीचे माजी उपसरपंच मारूती मरगळे, विराज पासलकर, पांडुरंग ढेबे यांनी दिली. कोंडिबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. कोंडिबा ढेबे यांच्या अपघाती निधनाने शिरकोली पानशेत परिसरावर शोककळा पसरली आहे.
कोंडिबा ढेबे हे शेतकरी होते. त्यांनी मेहनतीने पैसे कमवले होते. आता घराचे बांधकाम करणार. चांगल्या नवीन घरात राहणार, अशी स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण, हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही. रस्ते खराब असल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.