पुणे : पुण्यातील भवानी पेठेत गोडाऊनला आग (Fire broke out) लागल्याची घटना घडली. भवानी पेठेत आज पहाटेच्या सुमारास दोन गोडाऊनला ही आग लागली. येथील कपड्याचे गोडाऊन आणि त्याच्या शेजारीच असणाऱ्या बेकरीचे पॅकिंग मटेरियल बनवणाऱ्या गोडाऊनला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या (Firebrigade) तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अणि 20 मिनिटांच्या आत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. भवानी पेठेतील (Bhawani Peth) या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नसली तरी एक गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेदेखील अग्निशामक दलाने सांगितले आहे. मात्र आगीनंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट घटनास्थळावरून दिसत होते. अग्निशामक दलाने याठिकाणची आग आता आटोक्यात आणली आहे.
हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामध्ये यावर्षीच्य जुलैमध्ये आगीची भीषण घटना घडली होती. या आगीमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले होते. रहिवाशांकडे अंगावरील कपड्याशिवाय काहीही राहिले नव्हते. इतकेच नाहीतर वैदुवाडीतील एका कुटुंबातील मुलीचे लग्न तोंडावर असल्याने लग्नाशी संबंधित आणलेले सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता. रात्रीच्या वेळी आग लागल्याने सुरूवातील रहिवाशांच्या लक्षात आले नाही आणि नंतर आगीने रौद्र रूप धारण केले. अशाचप्रकारच्या घटना, कोंढवा, उरवडे, भोसरी, मोशी-पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये मागील काही दिवसांत घडल्या होत्या.
पुण्याच्या अनेक भागांत आगीच्या घटना घडतात. मात्र काही ठिकाणी प्रचंड नुकसान होते. अनेकवेळा अग्निशामक दल वेळेत पोहोचूनही घटनास्थळापर्यंत जाण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने अग्निशामक दल त्याठिकाणी पोहोचू शकत नाही. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. तर यातील काही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने रहिवाशांची पळापळ होते. भवानी पेठेतील ही आगदेखील पहाटेच्या सुमारास लागली. यात कपडे आणि बेकरीचे साहित्य जळून खाक झाले.