पुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये गाडीने पेट (Fire) घेतल्याची घटना आज सकाळी घडली. बोगद्यातून धुराचा लोट येत होते. आतमध्ये अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रासही जाणवत होता. या एकूण प्रकारामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कात्रजच्या नवीन बोगद्यात (Katraj new tunnel) आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. बोगद्यातील पंखे आणि दिवे बंद असल्याने मात्र आतमध्ये अडकलेल्या लोकांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. बोगद्यातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते. त्यामुळे प्रवासीही (Passengers) भयभीत झाले होते. जे आत होते त्यांना गुदमरल्यासारखे होत होते. दरम्यान, बोगदा परिसराची देखभाल दुरूस्ती वेळेवर व्हावी, लाइट्स, पंखे सुरू असावेत, जे खराब झालेत, त्याची दुरूस्ती व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांनी केली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, की रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कात्रज येथील नवीन बोगद्यात पुण्याहून शिंदेवाडीकडे जातानाच्या मार्गावर गाडीतील काही तांत्रिक बिघाडामुळे एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीत चारजण बसलेले होते. त्यांनी तत्काळ बाहेर पडत प्रसंगावधान राखले. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशामक दलाला संपर्क साधण्यात आला. मात्र अग्निशामक यंत्रणा येइपर्यंत ही गाडी जळून खाक झाली होती. यावेळी बोगद्यात धुराचे साम्राज्य पसरले होते. बोगद्यातील लाइट्स आणि पंखेही बंद असल्याने श्वास गुदमरल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे बोगद्यात अडकलेले प्रवासीही घाबरले होते. मात्र काही वेळात अग्निशामक यंत्रणा दाखल होत आग विझवण्यात आली.
बोगद्यात जात असताना आतमध्ये काय झाले, याचा अंदाज आधी आला नाही. मात्र पुढे गेल्यावर गाडीने पेट घेतल्याचे दिसले. बरेच अंतर कापले होते. त्यामुळे मागेही जाता येत नव्हते. दुचाकी असल्याने अंदाज घेऊन आम्ही पुढे पुढे जात राहिलो. कधी बोगद्यातून बाहेर पडू, असे झाले होते. धुरामुळे पुढील काही स्पष्ट दिसत नव्हते. अशा वातावरणातच आम्ही शेवटी बाहेर पडलो. या प्रकारामुळे प्रचंड भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. दुर्घटना घडण्याची सतत भीती असते. अशावेळी बोगदा परिसराची देखभाल-दुरुस्ती, पंखे, लाइट्स आदींची दुरूस्ती वेळेवर व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.