मावळ, पुणे / रणजित जाधव : कोल्हापूरहून मावळमध्ये पर्यटनासाठी आलेला एक तरुण अंदर मावळ येथील टाटा धरणात बुडाल्याची घटना काल सायंकाळी घडली. अरुण धनंजय माने असे बुडालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. मयत तरुणाचा शोध सुरु आहे. अद्याप मृतदेह हाती लागला नाही. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अरुण माने हा पाण्यात बुडाला. घटनास्थळी वडगाव मावळ आपदा टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमसह वडगाव मावळ पोलीस दाखल झाले.
कोल्हापूरहून 5 ते 6 पर्यटक तरुण अंदर मावळ वडेश्वर शिंदे घाटेवाडी येथे पर्यटनसाठी आले होते. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र पोहण्यासाठी टाटा धरणावर गेले. धरणात उतरल्यानंतर अरुण माने हा पोहत खोल पाण्यात गेला. मात्र पुन्हा किनाऱ्याकडे येत असताना त्याची दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला. हे सर्वजण कोल्हापूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. यानंतर तरुणाचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना पाचारण करण्यात आले. काल सायंकाळपासून तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.
मित्रासोबत भोर तालुक्यातील भाटघर धरणावर फिरायला आलेली तरुणी बुडाल्याची घटना काल उघडकीस आली. सदर तरुणी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी आहे. धरणाच्या काठावर बसली असता पाय घसरुन पाण्यात पडली. मात्र तरुणीचा नक्की अपघात झाला की घातपात आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.