अभिजीत पोते, पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) ज्यावेळी निर्माण करण्यात आला, त्यावेळी 1 लाखापेक्षा जास्त वृक्ष लावले जातील, असे आश्वासन त्यावेळच्या सरकारने दिले होते. 1995मध्ये ज्यावेळी हा हायवे सुरू झाला, त्यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देखील या आश्वासनाला दुजोरा दिला होता. पण हा देखील एक जुमलाच राहिला, असा आरोप आम आदमी पार्टीकडून (Aam Aadmi Party) आज पुण्यात पत्रकार परिषद घेत करण्यात आला आहे. सध्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर केवळ 45 हजारच झाडी शिल्लक आहेत. मग बाकीच्या झाडांचे नेमके झाले काय, असा सवाल देखील आपने सरकारला विचारला आहे. आपचे मुकुंद कीर्दत यांनी माहिती अधिकाराचा वापर करत ही माहिती मागवली असून यात एन एच 4 आणि यशवंतराव चव्हाण महामार्गावर मिळून अत्ता फक्त 64,035 वृक्ष शिल्लक असल्याची माहिती देखील उघड झाली आहे.
पुणे-मुंबई यशवंतराव महामार्गावर (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) आजस्थितीत फक्त 49,035 इतक्याच वृक्षांची नोंद असून 2005मध्ये 1 लाख झाडे उभारण्यात आले आहेत, असा दावा त्यावेळी केला होता. मात्र 2022मध्ये 51,000हून अधिक झाडे गायब असल्याचा आरोप आपने केला आहे. 1995पासून जेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे तयार केला जात होता, त्याला पर्यावरणवाद्यांचा पहिल्यापासूनविरोध होता. सह्याद्रीच्या घाटातून हा रस्ता जाणार होता. त्यामुळे मोठी वृक्षतोड होणार होती. अनेक प्रश्न होते. डोंगर भागांचेही नुकसान होणार होते. त्यामुळे असे ठरले, की किमान एक लाख झाडे लावायची ती ही दोन वर्षांत.
आयआरबीबरोबरचा जो करार झाला, त्यात संबंधित एमएसआरडीसीने कलम टाकले. नंतर कागदोपत्री झाडे लावल्याचे दाखवले. प्रत्यक्षात मात्र खूप कमी झाडे शिल्लक आहेत. इंडियन रोड काँग्रेसच्या कायद्यानुसार एका किलोमीटरमागे 999 झाडे लावण्याच्या कायद्याला हरताळ फासला गेला आहे. प्रत्यक्षात 50 टक्के झाडे गायब झाली आहेत. एकीकडे सामान्य माणसाला झाड तोडल्याबद्दल गुन्हा दाखल होतो. इथे 50-50 हजार झाडे गायब होतात, कोणावर कारवाई करणार, जबाबदारी कोणाची, असा सवाल मुकूंद कीर्दत यांनी केला आहे.