पिंपरी चिंचवड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवडच्या नेहरुनगरमध्ये जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. पण या जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी डॉक्टर आणि रुग्णांना घाम फुटल्याचं पाहायला मिळालं. कारण या जम्बो कोविड सेंटरमधील एअर कंडिशनची सुविधाच बंद पडली. सध्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. अशावेळी कोविड सेंटरमधील एसीची सुविधा बंद पडल्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना घामाच्या धारा लागल्या.(AC facility at Jumbo Covid Center in Pimpri Chinchwad shut down)
जम्बो कोविड रुग्णालयातील एसीची सुविधा पुर्ववत करण्यासाठी 72 तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी रुग्णांना इथं थांबणं कठीण जात आहे. त्यामुळे दुसरीकडे हलवण्याची मागणी इथल्या कोरोना रुग्णांनी केली आहे. दरम्यान एसीची सुविधा बंद पडल्यामुळे जम्बो कोविड सेंटर चालवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जम्बो कोविड सेंटरमधील उपचार करण्याचं आणि एसीचं काम करण्याचे ठेके वेगवेगळ्या कंपन्यांना दिले गेले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं नेहरुनगर इथल्या आण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये हे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आलं. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा 200 बेडची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. त्यामुळे नेहरूनगर इथल्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आलं होतं. आता ते पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
राज्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 1 एप्रिलपासून जम्बो कोविड सेंटर सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज कोविड सेंटरची साफसफाई करुन रुग्णांसाठी ते उपलब्ध करुन देण्यात आलं. पण पहिल्याच दिवशी एसीची सुविधा बंद पडल्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा लागल्या.
संबंधित बातम्या :
Pune corona : चौथ्या टप्प्यातील लसीकरण, महापौरांनाही लस, 15 लाख नागरिकांना लस देण्याचं टार्गेट
Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर
AC facility at Jumbo Covid Center in Pimpri Chinchwad shut down