पुणे : महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या (Active Covid patients) आता तीन महिन्यांत प्रथमच 10,000च्या खाली गेली आहे. जून अखेरीस राज्यात 25,000हून अधिक अॅक्टिव्ह केसेस लक्षात घेता ही एक मोठी घटना आहे. हवामानातील बदलांमुळे (Climate change) कोविडच्या केसेस कमी झाल्या आहेत. शिवाय स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही घट झाली आहे. इन्फ्लूएंझा आणि कोविडचा प्रसार जवळजवळ सारखाच आहे. वाढलेला पाऊस आणि आर्द्रता यामुळे प्रसार होण्यास चालना मिळते. कारण SARS-CoV-2 आणि इन्फ्लूएंझा विषाणू (Influenza) हवेतील आर्द्रतेच्या थेंबांवर पिगीबॅक करू शकतात, असे राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नोंदविले. दरम्यान, यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि निरभ्र आकाश याचा हा परिणाम आहे.
आकडेवारीनुसार 9 जूनच्या आसपास महाराष्ट्रात 11,571 सक्रिय कोविड रुग्ण होते. 19 जूनच्या आसपास ही संख्या 23,746वर पोहोचली आणि 27 जूनपर्यंत सक्रिय रुग्ण 25,570वर होते. पण 8 ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या निम्म्याहून कमी होऊन 11,900वर आली आणि ऑगस्ट अखेरीस ती 10,633वर आली. मंगळवारी, राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 7,701वर होता.
SARS-CoV-2 यामधील BA.5 सबवेरियंटमध्ये महाराष्ट्र काहीसा चांगल्या स्थितीत आहे. म्हणजेच याचा प्रसार टाळण्यात राज्याला यश आले आहे, असे दिसते. कारण आता राज्यातील नमुन्यांमध्ये 5%पेक्षा रुग्ण या व्हेरिएंटमधील असल्याचे दिसून आले आहे.
भारताच्या INSACOG नेटवर्कचे सदस्य डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, की BA.5मुळे काही देशांतील रूग्णांमध्ये गंभीर संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात सौम्य BA.2.75 सबव्हेरिएंटचा 75% प्रसार नोंदवला जात आहे, ज्यामुळे हॉस्पिटलायझेशन होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
डॉ आवटे म्हणाले, की आम्ही BA.2.75 संसर्गामध्ये वाढ पाहत आहोत, परंतु केसेसचे प्रमाण जास्त असले तरी लक्षणे सौम्य आहेत आणि लोक घरीच बरे होत आहेत. पुणे, मुंबई आणि ठाणे येथील नमुन्यांमध्ये BA.2.75चे प्रमाण जास्त आहे. प्रयोगशाळेनुसार, राज्यात 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 21 BA.5 रुग्ण आणि 216 BA.2.75 रुग्ण आढळले आहेत.