पुणे : पुणे महापालिकेनंतर (PMC) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. पीएमआरडीएने नुकतेच वडकी येथे उभारलेली बेकायदा (Illegal) बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पीएमआरडीएच्या बांधकाम परवानगी विभागाचे अधिकारी रामदा जगताप म्हणाले, की पीएमआरडीए केवळ बेकायदा बांधकामे पाडणार नाही तर ही बांधकामे पाडण्यासाठी लागणारा खर्चही वसूल करणार आहे. रितसर परवानगी न घेता लोकांना छोटे भूखंड विकल्याप्रकरणी पीएमआरडीएने सहा विकासकांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. पीएमआरडीएकडून ले-आऊटसाठी जमीन मालक आणि विकासकांनी मंजुरी न घेता आणि रितसर परवानगी न घेता ते लोकांना विकले होते. असे प्रकार वाढत असून त्यावर कारवाई करणे गरजेचे बनले असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मत झाले आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले, की छोटे भूखंड अनियोजित विकासाला चालना देत आहेत. याच्यामुळे भविष्यात अराजकता, विस्कळीतपणा निर्माण होईल. कारण येथे योग्य रस्ते, सेवा लाइन, सुविधा उपलब्ध नाहीत. भविष्यातही अशा भागात अग्निशामक दलाला पाठवणे कठीण होईल.
पीएमआरडीएच्या आणखी एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की सामान्यत: जेव्हा लहान भूखंड आवश्यक परवानगीशिवाय विकले जातात, तेव्हा परिसराचा विकास अनियोजित पद्धतीने केला जातो. बहुधा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक हे भूखंड खरेदी करतात. नंतर ते त्यांच्या इच्छेनुसार बांधकाम करतात. एकदा का इथली लोकसंख्या वाढली, की अधिकाऱ्यांना पाणी, वीज आणि ड्रेनेजची व्यवस्था करावी लागते, पण त्यामुळे शहरी विकासासाठी समस्या निर्माण होतात. त्यामुळे बेकायदेशीर भूखंड खरेदी करू नका. अशांवर पीएमआरडीए कारवाई करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.