पुणे : येत्या 9 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला 24 वर्ष पूर्ण होत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने केडगाव, अहमदनगर येथे महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहेत. या राज्यस्तरीय मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आज पुण्यात आढावा घेत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. कामं करा. कामं नाही केली तर एकएकाच्या कानाखाली आवाजच काढेन, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे चेहरेच पडले होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येकाने काम करायचं आहे. मूळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. भांडायचं नाही. नाही तर एकएकाच्या कानाखालीच आवाज काढेनं. यातून तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते. पवार साहेबांची होते. हा कोणता फाजिलपणा चाललाय? पदाचा राजीनामा घेईल हां. मी टोकाचा वागेन मग, असा सख्त इशाराच अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. एकदा पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असता. पण ही कोणती पद्धत आहे? हे मी नवीनच बघत आहे, असं ते म्हणाले.
पिंपरी चिंचवडच्या लोकांना बोलावलं नव्हतं का रे. पुण्यातून चांगली वाहन निघाली पाहिजे. चार चाकी हजार वाहनं मी ग्रामीण भागातील सांगितली आहे. शहरी भागातील नाही. शहरी भागातीलही दोन्ही शहरांची मिळून तेवढीच वाहने काढू शकतो. तेवढी ताकद आपली आहे. हडपसर विधानसभा आपल्यासोबत आहे. वडगावशेरी सोबत आहे. खडकवासला कमी मतांनी हरलो. इतर ठिकाणीही आपली ताकद आहे. त्यामुळे मी 8 तारखेला येतो. उद्या आणि परवा मी मुंबईत आहे. तोपर्यंत तुम्ही तयारी करा. आणि 8 तारखेला मला कुठपर्यंत तयारी झाली ते दाखवा. किंवा मी व्हिसीवर तुमच्याशी साधू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
आपली सर्व मदार पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवडवर आहे. त्यादृष्टीने नियोजन करा. गाडीच्या मालकाने इतरांनाही सोबत घेऊन यायला पाहिजे. एकटं येऊ नका. पाच ते दहा सीटांची गाडी असेल तर तेवढी माणसं घेऊन या. वाहने रिकामी आणू नका, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं.
दरम्यान, पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला होणार सुरुवात झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेणार आहे.