बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय असा थेट सामना होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत होत आहे. त्यामुळे पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभं ठाकलं आहे. अशातच विविध-विविध वक्तव्य केली जात आहेत. आधी लेकीला मतदान केलं आता सुनेला मत द्या, असं काही दिवसांआधी अजित पवार म्हणाले होते. त्यावर त्या मूळ पवार आहेत का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता. आता या सगळ्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी टीका केली आहे.
भारतातून निव्वळ 181 महिला लोकसभेत निवडून जाणार आहेत. 40 वर्षे झाली तरी बाहेरची… बाहेरची… बाहेरची… असं काही लोक म्हणत राहतात. पण महिलांचा मान सन्मान करणं आवश्यक आहे. देश एकसंध राहण्यासाठी देशाला मजबूत नेत्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
उद्या पुण्यात रेस कोर्स इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महायुतीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सभेला यावं. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आज चांगलं करत आहे. 140 कोटी जनतेचा कारभार कोण चांगल्या प्रकारे करेल याचा लोकांनी विचार करायला पाहिजे. आजपर्यंत बारामतीला ज्यास्तीत ज्यास्त निधी देण्याचा प्रयत्न केलाय. शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय स्वतः घेतला होत. शरद पवार बोलतील तसं मी वागत आलो, असं अजित पवार म्हणाले.
पुरंदर योजनेत अंतिम सही माझी झाली. कारण मी जलसंधारण मंत्री होतो. पुरंदर उपसा,जनाई आणि शिरसाई योजनेला लागणारी वीज सौरऊर्जेद्वारे पुरवणार आहोत. 2014 ला साहेबांच्या मताप्रमाणे भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. 2004 साली मुख्यमंत्री मिळाले असते परंतु काँग्रेसला पद दिले. मी विकासासाठी मत मागतोय. मला बारामतीने आजपर्यंत भरभरून दिले आहे. विरोधकांना पंतप्रधान यांच्यावर टीका करायला जागा नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.