पुणे : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या अजित पवार गटाची बैठक होणार आहे. प्रतोद अनिल पाटील बैठकीला सगळ्या आमदारांना हजर राहण्याची नोटीस काढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सगळ्या आमदारांना बैठकीचं निमंत्रण दिलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
अधिवेशनाच्या आधी बैठकीवरून उद्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात नोटीस सत्र रंगणार आहे. उद्या मुंबईतील बैठकीला हजर राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात येणार आहेत. अजित पवार गटाच्या बैठकीला कोण-कोण आमदार उपस्थित राहणार हे पाहावं लागेल.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आधल्या दिवशी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. विरोधक बहुधा चहापानावर बहिष्कार टाकतात. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधात आहेत. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री हे विरोधकांना चहापानासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमंत्रित करतील. परंतु, विरोधक चहापान करतात की, नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार हे पाहावं लागेल.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण हे नेते खिंड लढवतील. राज्य शासनाला हे महाविकास आघाडीचे नेते कोणत्या मुद्द्यांवर घेरतात, हे पाहावं लागेल.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. १९ दिवसांच्या कालावधीत चार सार्वजनिक सुट्या वगळता १५ दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे.