मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. घटक पक्षासह मोदी कॅबिनेटमध्ये भाजपच्या अनेक जुन्या आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक घटक पक्षांना अजूनही पदाची, मंत्रालयांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी पण मोठी मागणी केली आहे. सोमवारी याविषयीचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याची आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांना पाठविले पत्र
पुणे येथील पदाधिकारी, नेत्यांनी याविषयीचे एक पत्र अजित पवार यांना पाठवले आहे. दीपक मानकर यांच्यासह इतरांनी, सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. पक्षाचा केंद्रातील आवाज मजबूत व्हावा यासाठी सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात (MoS) समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
NCP ने केली होती ही मागणी
राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी केली होती. रविवारी नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्री पद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. पण एनसीपीने हा प्रस्ताव नाकारला. राष्ट्रवादी कॅबिनेट पदासाठी आजही आग्रही असल्याचे स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांचा पराभव
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्याविरोधात सुप्रिया सुळे या निवडून आल्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदारही महायुतीत सहभागी झाले. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी फुटली.
कायदेशीर लढाईनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला मिळाले. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला नवीन चिन्ह देण्यात आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोमवारी 25 वर्षे पूर्ण झाली. लोकसभेत शरद पवार गटाने अजित पवार गटापेक्षा दमदार कामगिरी बजावली.