पुणे: तात्या कधी येताय… वाट पाहतोय… अशी खुली ऑफरच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना दिली आहे. अजित पवार यांनी जाहीरपणे वसंत मोरे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मोरे हे आधीच मनसेत नाराज आहेत. त्यात आता त्यांना थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच पक्षात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने तात्या अर्थात वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात एका विवाह सोहळ्या निमित्ताने वसंत मोरे आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. त्यावेळी अजित पवार यांनी तात्या कधी येताय. वाट पाहतोय, अशी ऑफरच वसंत मोरे यांना दिली.
अचानक आलेल्या या ऑफरमुळे वसंत मोरेही क्लिनबोल्ड झाले. त्यांना काय बोलावे काहीच सूचेना. त्यांनीही नुसतंच स्मितहास्य करून हा विषय टाळला. मात्र, अजितदादांकडून थेट ऑफर आल्यामुळे मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार यांनी जाहीर नियमंत्रण दिल्याच्या वृत्ताला वसंत मोरे यांनी दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वसंत मोरे हे मनसेच्या कार्यपद्धतीला वैतागले आहेत. त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली आहे, तसेच पक्षाविरोधात आपली उघड नाराजी बोलूनही दाखवली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून आपली वारंवार अवहेलना केली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांची ही नाराजी ओळखूनच अजित पवार यांनी मौका साधून चौका मारल्याचं बोललं जात आहे. मात्र, मोरे यांनीही आपले पत्ते खोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक चालीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलश माझिरे यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर माझिरे यांनी मनसेलाच सोडचिठ्ठी दिली आहे. माझिरे यांच्यासह त्यांच्या 400 समर्थकांनीही मनसेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुणे मनसेत एकच खळबळ उडाली आहे.