पुणे: मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी कुणी तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला होता. त्यावर अजित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. एकाने तर माझाच फोटो सोसल मीडियावर व्हायरल केला. मला संपूर्ण राज्य ओळखतं. तरीही माझा फोटो व्हायरल केला. फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना ही प्रतिक्रिया दिली. एनसीबीने ड्रग्जप्रकरणी धाडी मारल्या होत्या. त्यावेळी एका बड्या नेत्याचा मुलगाही या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात पार्थ पवारांचं नावही पुढे आलं होतं, असा सवाल अजितदादांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, जे काही असेल ते तपासा. उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता. काही असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो माझ्या घरातला असेल किंवा इतरांच्या घरातला असेल. नियम कायदा सर्वाना समान असतो, असतो का नसतो? असा सवालच अजितदादांनी केला.
मी अलिकडे बघितलं की मीडियाने दखल घेतली पाहिजे अशी नावं सध्या घेतली जात आहेत. मध्यंतरी तर सोशल मीडियात अजित पवारांचाच फोटो दिला होता. देणाऱ्याला लाज, लज्जा, शरम काही आहे की नाही? मला अख्ख महाराष्ट्र ओळखतो, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धावर बोलण्यास नकार दिला. एक मिनिट… मला त्याबद्दल काही विचारू नका. मलिकांचे प्रश्न त्यांना विचारा. समीरचे प्रश्न समीर यांना विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आलो नाही. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विद्यापीठ पुलाच्या बाबत बोलायला आलो. कोरोनाबाबतचं सांगितलं. तसेच दरोड्याबाबत मी बोललो. एका मुलीच्या हत्येबाबत बोललो. ऐका जरा… मी मागही सांगितलं की इतरांनी काही केलं आणि ते असं म्हटले यावर उत्तरे द्यायला मी बांधिल नाही, असं त्यांनी संतप्त होतच स्पष्ट केलं.
अजित पवार हे मलिक यांच्या प्रश्नावर बोलण्यास नकार देत असताना पत्रकार त्यांना वारंवार प्रश्न विचारत होते. त्यावर अजितदादा अधिकच भडकले. थांबा ना साहेब… मी त्यांचं उत्तर द्यायला बांधिल नाही. मी तुम्हाला सांगितलं ना मलाही एक अधिकार आहे ना, नो कॉमेंट म्हणायचा. आहे की नाही…? जसा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना, तसा मलाही नो कॉमेंट म्हणायचा अधिकार आहे. तुम्ही मला ते प्रश्न विचारू नका. मी उत्तर देणार नाही. मला काही तेवढेच उद्योग नाही. त्याबाबत मी जे काही सांगतो ते ऐकून घ्या. तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा मी निघून जातो, अशी संतप्त प्रतिक्रियाच त्यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या:
गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली
तेच सुरु ठेवणार असाल तर उठून जातो, नवाब मलिकांच्या प्रश्नावर अजित पवार का भडकले?
(ajit pawar reaction on his photo viral in social media)