पुणे : राज्यात सध्या अस्तिक-नास्तिकतेवरून राजकारण शिगेला पोहोचलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन (Dagdusheth Ganpati) घेणार आहेत. असे सांगण्यात आले होते. तसेच ते भीडेवाड्याची पाहणीही करणार असेही सांगितले होते. त्याप्रमाणे पुण्यात दाखल होत शरद पवारांनी भीडे वाड्याची पाहणी केली. आणि शरद पवार पोहोचले श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, मात्र शरद पवारांनी मंदिरात न जाताच बाहेरून दर्शन घेतलं. त्यानंतर पवारांनी मांस खाल्लं (Meat) असल्याने ते मंदिरात गेले नाहीत, असे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंदिरात गेलं तरी अडचण नाही गेलं तरी नास्तिक म्हणतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यातबरोबर काही खोचक सवालही केले आहेत.
शरद पवारांच्या बाहेरुन दर्शनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, संविधानाने अधिकार दिलाय कुठंही जाण्याचा मात्र कोणी सांगतं कोणी सांगत नाही. तसं बाहेरूनच काहीजण दर्शन घेतात. नाही गेलं तर म्हणतात नास्तिक आहेत म्हणतात आणि आता गेलं तरी अडचण, मात्र बाहेरून नमस्कार करायला अडचण काय ? असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला आहे. तसेच कोणी काही चकीचं बोललं तर त्यावर बॅन आणा म्हणतात, त्यामुळे अमोल मिटकरीच काय माझ्यावरही बॅन आणा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंनी जे आरोप केलेले होते त्याला आज पवारांनी कृतीतून उत्तर दिलं आहे. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे. त्यामुळे शरद पवारांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, शरद पवारांनी या आधीही सांगितलेलं होतं की मी प्रचाराच्या वेळी मंदिरात जातो पण आज पवारांनी दर्शन घेतलं त्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची प्रतिक्रिया दिली आहे.
आज दगडूशेठ गणपतीला जायचे आहे हे माहिती होतं तरी सुद्धा शरद पवारांनी नॉन व्हेज खाललं, आम्हाला माहीत आहे की शरद पवारांना हिंदुच्या बाबतीत आकस आहे, ते नास्तिक आहेत, मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्याचं सांगून मंदिरात गेले नाहीत, मात्र हेच पवार इफ्तार पार्ट्या झोडायला जातात, अशी टीका भाजपच्या तुषार भोसले यांनी केली आहे.