मुंबई : राज्यात महसूल दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, महसूल दिनाच्या निमित्ताने आमच्या महसूल मंत्र्यांनी महसूल सप्ताह पाळायचं ठरवलं आहे. काल रात्री समृद्धी महामार्गावर शहापूर येथे दुःखद घटना घडली. त्यात १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. पंतप्रधान मोदी यांचे दिल्लीसाठी टेक ऑफ झाल्यानंतर मुख्यमंत्री घटनास्थळी गेले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, महसूल मंत्री विखे पाटील आणि मला या कार्यक्रमात हजर राहण्यास सांगितले. सगळ्या विभागांचे आयुक्त, जिल्हाधिकारी हजर होते. लोकाभीमुख काम करण्यासाठी असे कार्यक्रम करावे लागतात. आज महसूल दिनाचा शुभारंभ झाला. दोन ऑगस्टला युवा संवाद आहे. तीन तारखेला एक हात मदतीचा असा कार्यक्रम राबवला जातो. सात ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारोह आहे.
समृद्धी महामार्गावरील घटना दुर्दैवी आहे. घटनेनंतर मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी तिथं पोहचले. काम करणारी कंपनी हे सिंगापूर बेस्ड कंपनी आहे. ही जागतिक लेवलची कंपनी आहे. मृतक उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर होते. मृतकांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी दोन लाख रुपयांचे, तर मुख्यमंत्र्यांनी चार लाख रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केलं. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथं भेट दिली.
परिवार परिवार असतो. माझ्या काकींचे ऑपरेशन झाले तेव्हा मी भेटायला गेलो होतो. राजकीय भूमिका वेगळी असू शकते. परिवारातील भूमिका वेगळी असू शकते. टिळक पुरस्काराचा कार्यक्रम हा पूर्वी ठरलेला होता. टिळक परिवाराच्या वतीनं ट्रस्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्याचे ठरवले. शरद पवार यांनी टिळक परिवाराच्या वतीनं नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला होता. त्याला जोडून दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सुरू करण्याचा कार्यक्रम घेतला. पिंपरी चिंचवड येथील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा कार्यक्रम घेतला. पीएम आवास योजनेच्या घर वाटपाचा कार्यक्रम घेतला. दोन्ही बाजूने जात असताना मोदी यांचे पुणेकरांनी स्वागत केलं.
राजकीय भूमिका प्रत्येकाला असते. ती कुठं किती ताणायची याला मर्यादा असतात. कुठल्याही पंतप्रधानांना देशात चांगले वातावरण राहावे, असे वाटते. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना राज्यात कायदा, सुव्यवस्था चांगली राहिले पाहिजे, असं वाटतं. मणिपूरची घटना ही काळीमा फासणारी आहे. त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. देशाच्या सरन्यायाधीशांनी या घटनेची दखल घेतली.