पुणे : कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणूक (Kasba By-Election) होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले वाडेश्वर कट्ट्यावर आले होते. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार (All Party Candidate) या वाडेश्वर कट्ट्यावर चर्चा करताना दिसले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातील उभेच्छुक या कटट्यावर आले होते. त्यामुळं उमेदवार कोण असणार याबद्दल पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे हे उभेच्छुक आहेत. याबाबत अंकुश काकडे म्हणाले, मी इच्छुक नाही. पण, पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढेन. कुठंही मी पळपुटेपणा करणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही महाविकास आघाडी आहे.
वरिष्ठ नेते जोकाही निर्णय घेतील तो निर्णय आम्ही मान्य करू. कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी काँग्रेसचे १० उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार, शिवसेनेचेही उमेदवार येथे उपस्थित होते. हे लोकशाही जीवंत असल्याचं द्योतक असल्याचं अंकुश काकडे म्हणाले. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना या म्हणतो. सर्व इच्छुकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचार केला जातो, असंही अंकुश काकडे यांनी सांगितलं.
भाजपचे इच्छुक उमेदवार धीरज घाटे या वाडेश्वर कट्ट्यावर उपस्थित होते. धीरज घाटे म्हणाले, भाजपच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या भेटी झाल्या.कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घेतील. आम्ही २५ वर्षांपासून पक्षासाठी काम करतो. त्यामुळं निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असं सांगतो. त्यादृष्टिकोनातून पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटी घेतल्या.
मुक्ता टिळक या भाजपच्या आमदार होत्या. त्यांच्या निधनामुळं या कसबा विधानसभा क्षेत्रात ही पोटनिवडणूक होत आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हेही या कट्ट्यावर उपस्थित होते. मुक्ता यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा प्रदर्शित केल्याचं शैलेश टिळक यांनी सांगितलं.