शिर्डी: नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीला साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशावेळी दिल्लीतील काही महिला भाविकांना साई मंदिरात आरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगीची मागणी होत असल्याचा आरोप केला आहे. साई बाबांच्या आरतीसाठी 25 हजार रुपये देणगी देण्याची मागणी केल्याचा या महिलांचा आरोप आहे. देणगी काऊंटरजवळ देणगीचं आवाहन करणारे आणि देणगीदारांना कोणत्या सुविधा मिळतील, याबाबत फलक लावण्यात आले आहे. (Allegedly soliciting donations for Sai Baba’s Aarti)
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात फक्त 50 भाविकांना आरतीसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, फक्त देणगीदारांना आरतीला प्रवेश मिळत असल्याचा आरोप भाविकांनी आणि काही स्थानिक नागरिकांनीही केला आहे. दरम्यान, भाविकांकडून झालेल्या या आरोपाबाबत शिर्डी साई संस्थानकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
रविवारी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सलग तिसऱ्या दिवशी गर्दीचा आलेख वाढता आहे. दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत 30 हजाराहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. रविवारी दुपारपर्यंत तब्बल 10 हजार भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं होतं. ऑनलाईन पास व्यवस्थेपेक्षा ऑफलाईन दर्शन पास घेण्यावर साईभक्तांचा भर असल्याचं दिसून येत आहे.
साई बाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. अनलॉकनंतर आतापर्यंत रोज 6 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती. पण आता रोज 12 हजार भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आलं आहे. नाताळमुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात 8 हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर 4 हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत. 31 डिसेंबरला मंदिर खुलं ठेवायचं की नाही, याबाबत मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन
Allegedly soliciting donations for Sai Baba’s Aarti