राज्यात महायुतीचं सरकार आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार की नाही?; अमित शाहांनी दिली हिंट

| Updated on: Jul 21, 2024 | 6:09 PM

Amit Shah on Vidhansabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान भाजपच्या अधिवेशनाला अमित शाह हजर होते. त्यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

राज्यात महायुतीचं सरकार आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार की नाही?; अमित शाहांनी दिली हिंट
एकनाथ शिंदे, अमित शाह
Follow us on

केंद्रात आणि राज्यातही महायुती सरकार सत्तेत असताना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार? याची उत्सुकता आहे. राज्यात जर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की मुख्यमंत्रिपदी दुसऱ्या कुणाची वर्णी लागणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हिंट दिली आहे. भाजपच्या अधिनेशनात बोलताना अमित शाह यांनी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

महायुतीचं सरकार सत्तेत येणार- अमित शाह

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच सरकार सत्तेत येणार असल्याचं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं आहे. आज मी सांगतोय ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रात यंदा प्रचंड बहुमतासह महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे. माझे शब्द नीट लक्षात घ्या. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रत्यक्षपणे उल्लेख केलेला नाही. मात्र भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत येईल, असं अमित शाह म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

शरद पवारांवर टीकास्त्र

अमित शाह यांनी पुण्यात बोलताना शरद पवार यांचं नाव घेत टीका केली आहे. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, असा घणाघात अमित शाह यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं. तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. हे वाक्य मी विचार करुन बोलतोय. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे?, असं अमित शाह म्हणाले.