पुणे : ‘आता वय झालंय’ असे म्हणत हसून सर्व समस्यांना तोंड देणाऱ्या आणि आपल्या उत्साहाने तरुणांनाही लाजवेल असे उदाहरण ठेवणाऱ्या आजीबाई म्हणजे भामाबाई ताजणे (Bhamabai Tajne)… वय झाले असूनही या आजीबाई मोठ्या उत्साहात जुन्नरमधील शिवाईदेवीचे नित्यनेमाने दर्शन घेतात. विशेष म्हणजे या आजीबाईंना मणक्याचा त्रास आहे. असे असूनही शिवनेरी गडावर शिवाईदेवीच्या (Shivai devi) दर्शनाला पायऱ्यांवरून त्या चालत चालत जातात. त्यांच्या या उत्साहाने खासदार डॉ. अमोल कोल्हे हेदेखील (Amol Kolhe) प्रभावित झाले. त्यांना स्वत: या आजीबाईंना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांचे कौतुक केले. त्यासोबतच जो काही मणक्याचा आजार आहे, त्याच्या उपचारासंबंधी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. त्याचबरोबर त्यांच्या लेखाचेही त्यांनी कौतुक केले आहे.
ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचे नामकरण करण्यात आले, त्या आई शिवाईची रोज सेवा करणाऱ्या भामाबाईंना फोन करून मणक्याच्या त्रासाबद्दल विचारपूस केली, तर ‘आता वय झालंय’ म्हणत त्यांनी चक्क हसून उत्तर दिले! त्यांची सकारात्मकता मला ऊर्जा देऊन गेली. त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे, अशा आशयाचे ट्विट डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. त्यासोबतच त्यांनी भामाबाई ताजणे यांच्याशी साधलेला संवाददेखील ट्विट केला आहे. त्यांच्यासंबंधी आलेल्या लेखाबद्दलही त्यांनी आजींचे कौतुक केला आहे. दरम्यान, आजीला मदत करत आहात, मात्र गडाची दुरवस्था झाली आहे, त्यावरही काहीतरी करावे, अशी मागणी होत आहे.
ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचं नामकरण करण्यात आलं त्या आई शिवाईची रोज सेवा करणाऱ्या भामाबाईंना फोन करून मणक्याच्या त्रासाबद्दल विचारपूस केली तर ‘आता वय झालंय’ म्हणत त्यांनी चक्क हसून उत्तर दिलं!त्यांची सकारात्मकता मला ऊर्जा देऊन गेली.त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे. pic.twitter.com/FDACMEFNAU
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 13, 2022
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर राजमाता जिजाबाई यांच्या पूजेतील गडदेवता म्हणजे शिवाईदेवी… शहाजीराजांनी 1629मध्ये राजमाता जिजाऊ यांना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. याच गडावरील शिवाईदेवीवर जिजाऊंची श्रद्धा होती. यातूनच त्यांनी छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले होते. डोंगरकड्याच्या पाषाणात मोठ्या दगडी घुमटामध्येच शिवाई देवीची मूर्ती आणि तांदळा स्थापन करण्यात आलेला होता. दरम्यान, 1935मध्ये याठिकाणी नव्याने मूर्ती आणि तांदळा घडविण्यात आला आहे.