Pune Temperature : पुणेकरांना आणखी चार दिवस ‘ताप’! उष्णतेची लाट कायम तर विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

| Updated on: May 09, 2022 | 12:52 PM

महाराष्ट्रात 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Pune Temperature : पुणेकरांना आणखी चार दिवस ताप! उष्णतेची लाट कायम तर विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणेकरांना उन्हाच्या चटक्याने (Heat) हैराण केले आहे. त्यातच आता आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुढचे चार दिवस हा उष्मा कायम राहणार आहे. वेधशाळेनेच याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने त्रस्त झाला असताना हवामान विभागाने (IMD) ही ताप देणारी माहिती दिली आहे. विदर्भासह काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागाने दिला. विदर्भातील 7 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात रविवारी सकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाजवळ कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती शुक्रवारी झाली. शनिवारी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले.

चक्रीवादळाचा तडाखा

याचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्ट्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. हे वादळ सध्या पोर्ट ब्लेअरपासून 300 कि.मी., आंध्र प्रदेशपासून 1,270 कि.मी., तर ओडिशा किनारपट्टीपासून 1,300 कि.मी. अंतरावर घोंघावत आहे. अवघ्या 48 तासांत ते आंध्र व ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे या भागात 115 ते 204 मी. मी. पावसाचा अंदाज आहे.

11 मेपर्यंत उष्णतेची लाट

समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह सामान्य नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.