पुणे : बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम घेतल्यावर कोणा बिनडोक लोकांच्या भावना दुखत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे मत अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा पुण्यात झाला. चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, तुकाराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. बंदिस्त हॉलमध्ये कोणताही कार्यक्रम घ्यायला पोलिसांच्या परवानगीची गरज नसते. हे पोलिसांना समजावे यासाठी आता त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्यांबद्दल सध्या वाद सुरू आहे. हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर स्वतःच्या घरात म्हणा, हवे तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट का, असा सवाल त्यांनी केला. तसेच दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण (Politics) आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
इथे आज देवाच्या नावाने अविचाराचे दर्शन सुरू आहे. देव, अल्लाह, गॉड यांच्या नावाने बिनडोक झालेल्या लोकांचे राजकारण सुरू आहे. सुरवातीला धर्माचा संबंध हा अर्थकारणाशी होता. अर्थचक्राशी संबंधित देव ही संकल्पना आता राजकारणाशी संबंधित झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
जे नास्तिक आहेत असे सांगितले गेले त्यांची मुलगी म्हणते, आम्ही देवळात जातो. मग देवळात गेलेले जुने फोटो पुढे आणले जातात. निवडणुकीच्या वेळी आम्ही देवळात नारळ फोडतो, पण त्याचा गाजावाजा करत नाही, असे सांगितले जाते, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, भावना दुखावण्याचे कारण पुढे करत 10 एप्रिलला होणारा मेळावा रद्द झाला होता.