बारामती | 14 मार्च 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बारामतीत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. निलेश लंके यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही अजितदादांनी प्रकाश टाकला. राजकारणात कुणालाही कुठेही जाता येतं. वास्तविक निलेश लंकेला पक्षात मी आणलं. त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकासकामांसाठी निलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, असं अजित पवार म्हणाले.
कालच निलेश माझ्याकडे आला होता. मी निलेशसोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून… पण वास्तव तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय, असं अजित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. निलेश लंके यांच्या पुस्तकाचं आज पुण्यात प्रकाशन होत आहे. या कार्यक्रमादरम्यान निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. आज दुपारी चार वाजता लंके यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. लंके शरद पवार गटात परतल्यास अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल.
निलेश लंके यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. या कार्यक्रमासाठी लंके काही वेळा आधी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पत्नी आणि आईने निलेश लंके यांचं औक्षण केलं. आईच्या पाया पडून निलेश लंके पुण्याकडे निघाले. यावेळी टीव्ही 9 मराठीशी त्यांनी संवाद साधला. मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन आज होतंय. तर पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कोणीही मोठी व्यक्ती येऊ शकते. राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाही, असं सूचक विधान निलेश लंके यांनी केलं आहे.