लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेत बारामतीकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेला बारामतीमधील जनता थोरल्या पवारांच्या पाठीशी उभी ठाकली. आता या मतदारसंघात पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. अजितादादांनी ‘पवारांनंतर मीच’ असे वक्तव्य केले आहे. त्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या शाब्दिक टीकेनंतर या सामन्याला रंगत चढली आहे. कोणता पवार पॉवर फुल ते निकालानंतर समोर येईल.
बारामतीत प्रचाराला आली धार
बारामतीत अजितदादा गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहे. गावोगावी जाऊन ते मतदानासाठी आवाहन करत आहे. त्यांनी अनेकदा लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आणि त्यांनी या मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची उजळणी केली आहे. लोकसभेत तुम्ही मोठ्या पवारांना साथ दिली. हरकत नाही. पण आता या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी अनेक सभांमधून केले आहे.
प्रत्येक गावात शरद पवार यांची मोठं-मोठी बॅनर पाहून अजितदादांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या गटाला चिमटा काढला आहे. शरद पवार निवडणुकीला उभे आहेत की युगेंद्र पवार हे अगोदर सांगा असा टोला त्यांनी युगेंद्र पवारांना लगावला आहे. तर युगेंद्र याला लाखात कुठं टिंब देतात हे तर माहिती आहे का? असा टोला त्यांनी लगावला होता. त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी आणि काकींवर पण प्रचारातून निशाणा साधला आहे. त्यातच आता ‘पवारांनंतर मीच’ या वक्तव्यांनी त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
पवार साहेबाचं वय झालं आहे. आता पवार निवडणुकीच्या रिंगणात नाही ते आता ‘पवारांनंतर मीच’ इथपर्यंत प्रचार येऊन ठेपला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांच्यासह संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले आहे. शरद पवार यांच्याविषयी कोणी असं कसं बोलू शकतं, असा सवाल करत दोघांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
शरद पवारांनी टाकला बॉम्ब
‘पवारांनंतर मीच’ या अजितदादांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. “लोकांनी गंमत काय केली. त्यांनी लोकशाहीपद्धतीने मतदान केलं. त्यांना मतदान केलं नाही एवढंच ना. लोकांचा अधिकार आहे. लोकांनी कुणालाही मतदान केलं. उद्या कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख. म्हण बाबा माझी काय तक्रार. लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग”, असा टोला त्यांनी लगावला.
मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पुनरूच्चार केला. अजित पवार यांच्या बोलण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे, कुणीही कुणाच्या नंतर असं भाष्य करत नाही , मोदी शहा यांनी पण 200 वर्षे जगाव, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यानंतर मीच वाली म्हटलं होतं, ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही अशी खरमरीत प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.