बारामती (पुणे) : लग्न आणि संसाराबद्दल तरुण-तरुणींचे भरपूर स्वप्न असतात. लग्न केल्यानंतर देव दर्शनाला जावं, त्यानंतर कुठेतरी फिरायला जावं, अशी जवळपास प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तशा गोष्टी घडू नये म्हणून आपण अतोनात प्रयत्न करु शकतो. पण काही वेळेला काय घडावं हे आपल्याही हातात नसतं. बारामतीत देखील एक अशीच घटना घडलीय. ज्या मंडपात तरुणाचं लग्न झालं, आज त्याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे.
बारामतीत लग्नाच्या सहाव्या दिवशीच एका तरुणीचं कुंकू पुसलं गेलंय. नवऱ्या मुलाचा हृदयविकाराच्य तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुर्देवाने ज्या मंडपात लग्न झाले त्याच मंडपात मृतदेह ठेवण्याची वेळ आली. संबंधित घटना ही बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडलीय.
घरामध्ये लग्न कार्याचा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या येळे कुटुंबीयांमध्येही होता. मात्र येळे कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला .
काही दिवसांपूर्वीच लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू येळे याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
लग्नासाठी घरासमोर येळे कुटुंबाने मंडप उभारला होता. आता या मंडपातच नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ येळे कुटुंबावर आली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलंय.