अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यभरातील नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी युवती आघाडीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवर भाष्य केलं आहे. सक्षणा यांनी शिंदे सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. ‘लाडकी बहीण योजना’ ही तीन महिन्यांनी ‘सावत्र बहीण योजना’ होणार आहे, असं सक्षणा सलगर म्हणाल्या आहेत. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना बारामतीकरांना आवाहनही केलं आहे.
‘लाडकी बहीण योजना’ ही तीन महिन्यांनी ‘सावत्र बहीण योजना’ होणार आहे. 1, 500 रुपयाला भुलू नका. शरद पवार यांनी महिलांसाठी कार्य केलंय. महिलांना आरक्षण दिलं. म्हणून महिला सरपंच, महापौर होवू शकतात. हे काम शरद पवारांनी केलं आहे. त्यांची 1, 500 रुपयाची अगरबती कुठे ओवाळायची? त्यामुळे आज आम्ही सगळे सोडून गेले तरी सह्याद्री पुत्रासोबत उभं राहिलो याचा आम्हाला अभिमान आहे, असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेवर भाष्य केलं आहे. बहीण किती लाडाची असते… बहीण आणि सून हा सुरु झालेलं वाद इथपर्यंत आला की, सरकारला पण ‘लाडकी बहीण योजना’ आणावी लागली. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊन प्रचार करावा लागला अन् आता आज योजना आणावी लागते, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी अजित पवारांना उपरोधित टोला लगावला आहे. युगेंद्र पवार चांगलं काम करतायेत. संयमी नेतृत्व पुढे आहे. अपेक्षेच ओझं तुमच्या खांद्यावर टाकतेय, असंही त्या म्हणाल्या.
पहिल्यांदा कार्यक्रम घेतला तरी तुम्ही चांगलं प्रतिसाद दिला आहे. 37 व्या वर्षी पवारसाहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 18 जुलैला शपथ घेतली होती. ते रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही. पवारसाहेब आपले बारामतीचे आहेत. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अहिल्या बाई होळकर यांनी दाखवून दिल की महिलेला संधी दिली तर त्या चांगल्या काम करू शकतात. अहिल्याबाई होळकर यांचं एक स्मारक आणि गार्डन केलं पाहिजे. लवकरच आपल्याला ते स्मारक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा युगेंद्र पवारांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.