बारामती, पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही, असं म्हटलं. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला. राज्यात ही दडपशाही सुरू आहे. दडपशाहीच्या समोर सुप्रिया सुळे कधीच वाकणार नाही. ही दडपशाही आहे. याचा मी जाहीर निषेध करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचा जीव घेतला तरी बेहत्तर… पण आम्ही घाबरणार नाही. दोनशे आमदार असताना रामराज्य आलं पाहिजे. मात्र इथे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रिपल इंजिन ओके सरकारने कोणती मर्यादा ठेवलेली नाही. आपण कोणत्या जगात आहोत? याबाबत आम्ही ताकदीने लढणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल. जर राज्यात वकील डॉक्टर, पत्रकार, सुरक्षित नसतील तर मग देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा. एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्यांच्यात मित्र पक्षातील सहकार्याला गोळी घालतो. केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असं सांगतो. नागपूर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे का? पुण्यात ठाण्यात आणि नागपूरला या तिन्ही शहरात ज्या पद्धतीने हत्या होत आहेत. हे दुर्दैवी आहे. मग लोकांसाठी न्याय मागायचा का नाही ? राज्यात दडपशाही सुरू आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएमच्या माध्यमातून होत आहे. हा आरबीआयचा डेटा सांगतो. कांद्याच्या निर्यात बंद करण्याचं कारण काय? शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला का? शेतकऱ्यांच्या विरोधातले हे केंद्र सरकार आहे. पक्ष फोडणं, घरं फोडणं एवढंच काम सरकार करीत आहे. अनेक समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ओरिसा,आंध्रप्रदेश,जम्मु काश्मीर यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेतला ? मग मराठा आणि धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का घेतला नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.