बारामती, पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच पवारांच्या बारामतीत एक घटना घडली. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता. बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोणी केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे.लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलत होत्या. बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात. त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी, बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत..याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. रूरल इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. मी गेल्या काही दिवसांपासून सरकारला विनंती करीत आहे. पण सरकारकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत नाही, असंही त्या म्हणाल्या.