योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती, पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : बारामतीतील पवार कुटुंब… राज्याच्या राजकारणात दबदबा असणारं कुटुंब… पण अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. पर्यायाने पवार कुटुंबावरही याचे परिणाम जाणवू लागले. आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकाऐवजी आजोबांना साथ देण्याचं ठरवलं आहे. उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यलयाला भेट दिली. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे युगेंद्र राजकारणात येणार असल्याचं बोललं जात आहे. युगेंद्र पवार नेमके कोण आहेत? जाणून घेऊयात…
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. युगेंद्र हे युवा नेतृत्व आहेत. शांत स्वभाव आणि संयमी व्यक्तीमत्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तरूणांनी राजकारणात आल पाहिजे. नेतृत्व केलं पाहिजे, असं त्यांचं ठाम मत आहे. त्यासाठी ते तरूणांना प्रोत्साहन देत असतात.
बारामती आणि परिसरातील तरूणांनी राजकारण आणि उद्योगात पुढे यावं यासाठी ते प्रेरित करतात. या शिवाय युगेंद्र हे व्यावसायिक आहेत. शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शरयू अॅग्रो कंपनीचे ते सीईओ आहेत. या शिवाय बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत. बारामती कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष आहेत.
सतत तरूणांमध्ये वावर असल्याने युवकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे युगेंद्र यांनी जर आजोबा शरद पवार यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. तर याचा शरद पवार गटाला निश्चितच फायदा होईल. अजित पवार यांच्या मतांवर मात्र नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र यांनी कुस्ती सामन्यांचं आयोजन केलं होतं तेव्हापासूनच ते शरद पवार गटात सक्रीयपणे सहभागी होतील, अशी चर्चा होती.