बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. काल अजित पवार यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत बारामतीतील कन्हेरी गावात सभा घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शरद पवार त्यांच्यासोबत होते. आज बारामतीतील कन्हेरी गावात आज शरद पवारांची सभा होत आहे. कन्हेरी गावातील मारुतीचं दर्शन घेत पवार कुटुंबीय आपल्या प्रचाराला सुरुवात करतात. पवार कुटुंबाची ती परंपरा आहे. त्यामुळे याच कन्हेरी गावात आज युगेंद्र पवारांच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. या प्रचारसभेत युगेंद्र पवारांनी भाषण केलं.
शरद पवारसाहेब माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. मी सर्व बारामतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकसभेला वाटत होतं घासून होईल परंतु तसं झालं नाही. बारामतीचे नाव हे जगात मोठं केलं ते शरद पवार यांनी केलं आहे. मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासून बारामती ही शरद पवार यांच्या नावाने ओळखतात हे मी ऐकले आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले.
माझे आदर्श हे फक्त पवारसाहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात. त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधीही शरद पवार यांना सोडणार नाही. पवारसाहेब नेहमी जनतेचा विचार करतात. म्हणून बारामती कर त्यांच्यामागे ठाम उभं राहतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी शरद पवार यांनी केली. जगातला सर्वात निर्यातदार देश आपण झालो. ही बाब फक्त शरद पवार यांच्यामुळे शक्य झालं आहे.
आताची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकसभेत यश नाही मिळालं म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. दोन महिने ही योजना चालवली आणि आता बंद केली. 100 रुपयांचा स्टॅम्प 500 रुपयाला नेला. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत, असं म्हणत युगेंद्र पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.