पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. कर्नाटकातील विजयाचा कित्ता अन्य राज्यात गिरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कर्नाटकच्या विजयामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसला बळ मिळाल्याच चित्र आहे. पण वास्तवात परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुंबईतील एका बैठकीत पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेलं चित्र उत्साहवर्धक नाहीय.
पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. पण आता इथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुण्यावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये पुण्याच्या जागेवरुन जुंपलेली असताना आता पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आलाय.
नाना पटोलेंसमोरच सर्व घडलं
मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधला असलेला वाद उफाळून आलेला दिसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच पुण्यातील काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड केली. विरोधात काम केलेल्या लोकांना नेते जवळ करतात, असं पुणे काँग्रेसमधील नेत्यांच मत होतं.
कोणी नाराजी व्यक्त केली?
माजी मंत्री रमेश बागवे यांनी आरोप केला. रमेश बागवेंनी नाना पटोले यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयीची नाराजी मांडली. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान पुण्यातील काँग्रेसमधला वाद उफाळून आला.