पुणे : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यातील भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाकडून (Bharatiya Janata Yuva Morcha) संभाजी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ, इशारा यावेळी भाजपा युवा मोर्चाने दिला आहे. सांगलीच्या (Sangli) इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता. कन्या हा दान करण्याचा विषय नाही, असे त्यांनी म्हटले होते. कन्यादानावेळी सांगितलेल्या मंत्राचा अर्थ मी सांगितला होता, असे मिटकरींनी म्हटले होते.
ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात पुण्यात काल आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा दिसून आला होता. मिटकरी मानसिक रुग्ण आहेत, असा हल्ला यावेळी ब्राह्मण महासंघाने केला होता. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरी यांनी विधान केले होते. मात्र यामुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला. यावेळी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला राष्ट्रवादीनेही विरोध केला.