पुणे : भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. तीन ते चार तासांआधी केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस वेगाने कामाला लागले आणि अवघ्या काही तासांमध्ये केदार जाधव याच्या वडिलांना त्यांनी शोधून काढलं आहे. केदारने याबाबत स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडी भागात महादेव जाधव हे सापडले आहेत.
केदार जाधवचे वडील महादेव जाधव हे सकाळी 11.30 सुमारास घराबाहेर पडले होते. द पॅलेडियमन, सिटी प्राईड कोथरूडमधून ते मेन गेटने बाहेर रिक्षाने गेल्याचं बोललं जात आहे. पाच वाजेपर्यंत ते माघारी न परतल्याने घरच्यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांसह केदार जाधव याने आपल्या सोशल मीडियावरून एक फोटो आणि बेपत्ता असल्याची माहिती देत दिसल्यास संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. पोलिसांनी तपास वेगाने करत अवघ्या चार तासांत वडिलांचा शोध घेतला. केदारने वडील सापडल्यानंतरही पोस्ट करत सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
केदार जाधवने आपले वडील महादेव दादा जाधव वय अंदाजे 85, 27 मार्च 2023 ला सकाळी 11.30 फिरायला गेले असता स्मृतीभ्रंशामुळे कोथरूड येथून हरवले आहेत. सापडल्यास तात्काळ संपर्क करा, असं त्याने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्याने संपर्क क्रमांक दिला असून 8530444472 यावर संपर्क साधायला सांगितला होता.