पुणे: अखेर महाविकास आघाडी आणि भाजपचं कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक लढायचं ठरलं आहे. दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना चिंचवडची निवडणूक लढणार नाही. काँग्रेस कसब्यातून तर राष्ट्रवादी चिंचवडमधून लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मंगळवार 7 तारखेपर्यंत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यापूर्वीच भाजप आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कसब्यातून हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहेत. तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला.
भाजपचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं होतं. त्यामुळे चिंचवडची जागा रिक्त झाल्याने या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली. जगताप यांचं निधन झाल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली.
तर, भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच निधन झालं. त्या कसब्याच्या आमदार होत्या. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणूक लागल्याने टिळक यांच्या कुटुंबियांनाच उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात होतं. मात्र, टिळक यांच्या कुटुंबीयांना भाजपने तिकीट दिलं नाही. त्याऐवजी भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फोनवरून चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.